खबरकट्टा/ चंद्रपूर:
जिवती तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भारीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कमलापूर गावची कथा अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे. मागील 30 वर्षांपासून येथील नागरिक अजूनही नाल्यातील पाणी पितात. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
गावातील नागरिक मोतीराम रायसिडाम यांनी सांगितले की, 35 वर्षापूर्वी गाव वसले. गावात 80 ते 85 एवढी लोकसंख्या आहे. गावातील शाळा कधीच बंद झाली. तेथील विद्यार्थ्यांना चिलाटीगुडा येथे लागते. शाळेसाठी जावे लागते. गावात ग्रामपंचायतीकडून केवळ 30 मीटर काँक्रीट रोड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावात चिखलाचे साम्राज्य असते. विशेष म्हणजे, मानवाची मूलभूत गरज समजली जाणारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने तेथील नागरिकांना नाल्यातीलच पाण्यावर तहान भागवावी लागते
आम्ही नाल्यातील पाणी पितो आणि पाणीपट्टी मात्र दरवर्षी घेतली जाते. पूर आला की नदीत पाण्यासाठी यावे लागते. कधी कधी पूरस्थिती गंभीर असताना जिवाची बाजी लावून पाणी भरावे लागते. पाण्याची लाट कधी येईल अन् कधी घेऊन जाईल अशी स्थिती झालेली असते.
कमलापूर येथे एक विहीर अस्तित्वात असून सध्या तिथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुवठा योजना मंजूर झाली आहे. या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे सदर काम पूर्ण झाल्या तेथील पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे.
- विवेक तितरे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत भारी.

