विजय वडेट्टीवारांना बदनाम करण्याचं 'चुकीचं टायमिंग'? #vijaywadettiwar #chandrapur #congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


विजय वडेट्टीवारांना बदनाम करण्याचं 'चुकीचं टायमिंग'? #vijaywadettiwar #chandrapur #congress

Share This
राजकारणात तलवारीचे वार कमी आणि अफवांचे वार जास्त घातक असतात. काही लढाया विरोधकांशी नसतात; त्या स्वतःच्या घरातच लढल्या जातात.

खबरकट्टा / राजकीय : 

चंद्रपूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे—विजय वडेट्टीवार शिवसेनेत जाणार?

ही चर्चा खरी आहे की केवळ राजकीय धुरळा? हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, त्याहून महत्त्वाचा प्रश्न कदाचित दुसरा आहे—ही चर्चा नेमकी आत्ताच का सुरू झाली?

कारण राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते—अफवा कधीच एकट्या जन्माला येत नाहीत; त्या नेहमी एखाद्या राजकीय पार्श्वभूमीवर उभ्या राहतात.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला. सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले. जनतेला वाटले, आता शहरात काँग्रेसची सत्ता येईल आणि विकासाला नवे वळण मिळेल. पण पुढे जे घडले, त्यात विकासापेक्षा गटबाजीचीच चर्चा जास्त झाली.

महापालिकेतील गटनेतेपदाचा वाद उफाळला आहे.नेतृत्वाच्या निर्णयांवरून अवघ्या पाचच महिन्यात अनेक मतभेद झाले. आता प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले.यात राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू विरोधक नाहीत तर्  काँग्रेसच्या घरातील संघर्षच आहे.

याच काळात विधान परिषद निवडणुकीनंतरही जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर अनेक चर्चा सुरू राहिल्या. काँग्रेस च्या एका गटाने नगरसेवकांना भाजपकडून पैसे घेऊन आपल्या बाजूने वळवल्याचाही चर्चा रंगल्या त्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला. अशा वातावरणात अचानक विजय वडेट्टीवार यांच्या पक्षांतराच्या अफवा समोर आल्या आहेत.

मात्र या चर्चेला आजतागायत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.राजकारणात योगायोग कमी असतात... आणि टायमिंग कधीचं साधं नसतं!

मग प्रश्न पडतो—जेव्हा गटबाजी आधीच चर्चेत आहे, तेव्हाच अशा अफवांना वेग का येतो?

राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, अंतर्गत संघर्षाच्या काळात अफवा अधिक वेगाने पसरतात. कारण अशा वेळी प्रत्येक संदेश, प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक कुजबुज याला राजकीय अर्थ प्राप्त होतो.

आणखी एक प्रश्न काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल अशा चर्चा सातत्याने पुढे आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे का? त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत शंका निर्माण करून दुसऱ्या गटाला,त्यांच्या बाजूच्या आणखी काही लोकांना आपल्या बाजूने वळवायचे आहे का ? अशा चर्चांमुळे त्यांच्या राजकीय प्रभावाला धक्का देणे, त्यांच्या समर्थकांना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणे किंवा स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना.या प्रश्नांची उत्तरे सध्या उपलब्ध नाहीत; पण एवढे मात्र खरे की अफवांचा सर्वाधिक परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होतो.

आज काँग्रेससमोरचा खरा प्रश्न आहे की,ह्या पक्षांतराच्या चर्चेपेक्षा, जनतेने दिलेला विश्वास टिकवायचा की अंतर्गत संघर्षातच ऊर्जा खर्च करायची?

राजकारणात प्रत्येक चालेला उत्तर असते. पण प्रत्येक अफवेचे उत्तर देत बसावे लागले, तर जनतेच्या प्रश्नांसाठी वेळ उरत नाही.

शेवटी...
"राजकारणात बातम्या एका दिवसाच्या असतात; पण वि
श्वास अनेक वर्षांनी तयार होतो. आणि एकदा विश्वास डळमळला की, अफवांना पाय फुटायला वेळ लागत नाही."
राजकारणातील आणखी एक वास्तव म्हणजे, निवडणुकांनंतर पक्षातील नेतृत्वाचा प्रश्न अधिक तीव्र होतो. विधान परिषद निवडणूक, महापालिका राजकारण आणि भविष्यातील स्थानिक समीकरणे या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर काँग्रेसमध्ये नेतृत्वाची स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे दिसते. अशा वेळी प्रत्येक घडामोडीचा /चर्चेचा अर्थ राजकीय चष्म्यातून लावला जातो.

यामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो—चंद्रपूरमधील काँग्रेसची ऊर्जा विरोधकांविरुद्ध वापरली जात आहे की स्वतःच्या अंतर्गत संघर्षात खर्च होत आहे?

जनतेला शेवटी विकास, प्रतिनिधित्व आणि स्थिर नेतृत्व हवे असते. गटनेते कोण, कोणाचा प्रभाव जास्त आणि कोणाचा गट मोठा यापेक्षा शहराचे प्रश्न अधिक महत्त्वाचे असतात. पण जेव्हा अंतर्गत संघर्ष मुख्य चर्चेचा विषय बनतो, तेव्हा जनतेच्या अपेक्षा मागे पडतात.

आज परिस्थिती अशी आहे की विजय वडेट्टीवार, धानोरकर गट, महापालिका, गटनेतेपद आणि पक्षांतर्गत संघर्ष या सर्व गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या दिसतात. मात्र अंतिम प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे—या संघर्षातून काँग्रेस मजबूत होत आहे की स्वतःचीच राजकीय ताकद कमी करत आहे?

लढाई जर घराच्या अंगणातच सुरू राहिली, तर किल्ला जिंकण्याआधीच दरवाजे कमकुवत होतात. आणि राजकारणात दरवाजे कमकुवत झाले की विरोधकांना हल्ला करावा लागत नाही; ते फक्त वाट पाहतात.

आज विजय वडेट्टीवारांविषयी सुरू असलेल्या चर्चांपेक्षा मोठा प्रश्न चंद्रपूरच्या काँग्रेसपुढे आहे—पक्षाची ऊर्जा विरोधकांशी लढण्यात खर्च होणार की स्वतःतील मतभेद मिटवण्यात?

कदाचित याचे उत्तर पुढच्या काही महिन्यांत मिळेल. पण तोपर्यंत एवढेच म्हणावे लागेल—

"राजकारणात वेळच सर्वात मोठा खेळाडू असतो... आणि कधी कधी चुकीच्या वेळी उडालेली एक अफवा सुद्धा संपूर्ण राजकीय पट बदलण्याची ताकद ठेवते."

#vijaywadettiwar #Congress #chandrapur 

Pages