अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांचा समावेश आहे. दोघींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघीही भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जात असल्याने या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर | प्रतिनिधी : 2 जुलै 2026
चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या नवजात बालक विक्री व मानवी तस्करीच्या धक्कादायक प्रकरणात रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुरुवातीला संशयित दलाल म्हणून समोर आलेल्या दोन महिला साक्षीदारांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या या दोघी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारातून झाली. पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर तिची ओळख मुख्य आरोपी अजय फुलझेले याच्याशी झाली. त्यानंतर दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात अजय फुलझेले याने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली.
ही घटना लपविण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. तेथे तिचे वय चुकीचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नागपूरच्या अजनी पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांकडे वर्ग केले. रामनगर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणामागे नवजात बालकांच्या विक्रीचे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला.
पोलीस तपासात संबंधित महिलेने यापूर्वी दोन नवजात बालकांची सुमारे दोन लाख रुपयांत विक्री केल्याची माहिती समोर आली. तसेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बालकाचीही विक्री करण्याचा व्यवहार निश्चित करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिसऱ्या नवजात बालकाची विक्री होण्यापूर्वीच हा कट उधळण्यात आला.
या प्रकरणात सुरुवातीला पीडित अल्पवयीन मुलीची आई, तेलंगणातील कागजनगर येथील एक महिला आणि चंद्रपूर शहरातील एक महिला अशा नवजात बालके खरेदी केल्याचा आरोप असलेल्या महिलांना अटक करण्यात आली. विक्री झालेली दोन्ही नवजात बालके सुरक्षित असून त्यांना 'किलबिल' संस्थेत ठेवण्यात आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी नवजात बालकांच्या विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या दोन महिलांची ओळख पटविली होती. सुरुवातीला या दोघी महत्त्वाच्या साक्षीदार म्हणून तपासाच्या कक्षेत होत्या. मात्र पुढील तपासात नवजात बालकांच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, दस्तावेजीकरण आणि व्यवहाराच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना संशयित दलाल म्हणून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांचा समावेश आहे. दोघींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघीही भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जात असल्याने या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नवजात बालकांच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, दस्तावेजीकरण आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेत या दोन्ही महिलांची भूमिका असल्याचा आरोप आहे. याच आधारे त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पैशांचा प्रवाह, कागदपत्रांची साखळी, इतर संबंधित व्यक्ती तसेच राज्याबाहेरील संपर्क यांचाही तपास सुरू आहे. त्यामुळे या मानवी तस्करीच्या रॅकेटमधील आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई, नवजात बालके खरेदी केल्याचा आरोप असलेल्या महिला आणि आता अटक करण्यात आलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध मानवी तस्करी, पॉक्सो कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांतील गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आलेले हे प्रकरण केवळ नवजात बालक विक्रीपुरते मर्यादित नसून, मानवी तस्करीचे संघटित जाळे कार्यरत असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. मुख्य आरोपी अजय फुलझेले व अल्पवायीन मुलीच्या आई ला आधीच अटक झालेली आहे.या रॅकेटमधील प्रत्येक संबंधित व्यक्तीचा पर्दाफाश करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
#WomenSafety #HumanTrafficking #Chandrapur #JusticeForChildren
अल्पवयीन मुलीच्या नवजात बालक विक्री प्रकरणाचा सर्वंकष तपास करून मानवी तस्करीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा आणि कोणत्याही आरोपीला राजकीय संरक्षण देऊ नये, या मागणीसाठी शिवसेना नेत्या डॉ. मनीषाताई कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमती शारदा मनोहर पाचभाई यांनी शेकडो शिवसैनिक महिलांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत महिला व बालकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही. प्रत्येक दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली.#ShivSena



