21 डिसेंबर ला होणार ही मोठी घटना : बघायला विसरू नका #Great conjunction of Jupiter and Saturn - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


21 डिसेंबर ला होणार ही मोठी घटना : बघायला विसरू नका #Great conjunction of Jupiter and Saturn

Share This
खबरकट्टा / गुरु -शनी महायुती : Great conjunction of Jupiter and Saturn


येत्या २१ डिसेंबरच्या संध्याकाळी आकाशात एक दुर्मिळ घटना बघता येणार आहे मकर तारकासमूहात दिसणारे गुरु आणि शनी जवळ येत येत २१ डिसेंबरला एकमेकांच्या अगदी जवळ दिसणार आहेत.


कधीकधी पृथ्वीवरून बघतांना दोन खगोलीय घटक ( ग्रह ,तारे ,चंद्र इत्यादी ) एकमेकांच्या जवळ आल्यासारखे आपल्याला दिसतात याला युती (conjunction) असे म्हटले जाते.प्रत्यक्षात हे घटक एकमेकांच्या जवळ असतीलच असे नाही.गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा मारायला १२ वर्षे तर शनीला २९.५ वर्षे लागतात.दोघांच्या या परिभ्रमण काळात दर २० वर्षांनी गुरु- शनी एकमेकांच्या जवळ आल्यासारखे वाटत त्यांची युती आपल्याला दिसते.या आधी ३१ मे २००० रोजी अशी युती होती तर या पुढे ५ नोव्हेंबर २०४०ला पुढील अशी युती असेल.


दर २० वर्षांनी गुरु -शनी युती होत असली तरी २१ डिसेंबर २०२० ची महायुती(Great conjunction) मात्र दुर्मिळ आहे.यावेळी शनी आणि गुरु हे एकमेकांच्या अगदी जवळ आल्यासारखे दिसणार आहे.यावेळी त्यांचातील पृथ्वीसापेक्ष कोनीय अंतर ६ आर्क सेकेंद इतके कमी असेल.यामुळे साध्या डोळ्यांना गुरुच्या तेजस्वी ठिपक्याला अगदी लागून शनी दिसू शकेल.द्वैती तार्यासारखे गुरु-शनी जणू “द्वैती ग्रह"(Double Planet) असल्यासारखे या वेळी आपल्याला वाटतील.


सध्या हे दोन्ही ग्रह सूर्यास्तानंतर काही वेळ पश्चिम आकाशात दिसत आहेत. यांचे रोज निरीक्षण केल्यास गुरु हळूहळू शनीच्या जवळ येताना आपल्याला दिसेल. २१ डिसेंबरच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर संधीप्रकाशात तेजस्वी गुरु दक्षिण -पश्चिम आकाशात दिसायला लागेल. संपूर्ण अंधार पडल्यावर ही महायुती अधिक चांगली दिसेल. साध्या डोळ्यांनी देखील दृश्य दिसणार आहे.दुर्बीण असल्यास अधिक चांगले निरीक्षण आणि फोटोग्राफी देखील करता येऊ शकेल.दुर्बिणीतून पट्टेदार तेजस्वी गुरु ,त्याचे ४ प्रमुख उपग्रह, अगदी जवळ कडीदार शनी आणि त्याचे उपग्रह असे सुंदर दृश्य एकाच फ्रेम मध्ये दिसेल.साधारण ८ च्या सुमारास हे ग्रह मावळेपर्यंत हे दृश्य बघता येईल.


या आधी १६ जुलै १६२३ मध्ये अशी महायुती झाली होती.पण तेव्हा हे दोन्ही ग्रह सूर्यापासून फक्त १३ अंशावर असल्याने हे दृश्य दिसले असण्याची शक्यता कमी आहे.त्याच्या आधी ४ मार्च १२२६ ला अशी महायुती दिसली होती. 

म्हणजे २१ डिसेंबरला तब्बल ८०० वर्षांनंतर मानवाला गुरु आणि शनी इतके जवळ असल्याचे दिसणार आहे.म्हणून ही घटना दुर्मिळ आहे.तेव्हा २१ डिसेंबरला ही सुंदर खगोलीय घटना बघायला विसरू नका.

Pages