रत्नाकर चटप : कर्तृत्व आणि नेतृत्वाचा शिलेदार गोंडवन मातीचा सांस्कृतिक सुगंध लेखक - अविनाश पोईनकर #avinash-poinkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


रत्नाकर चटप : कर्तृत्व आणि नेतृत्वाचा शिलेदार गोंडवन मातीचा सांस्कृतिक सुगंध लेखक - अविनाश पोईनकर #avinash-poinkar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 




दाराबाहेर पाय ठेवला की विविधांगी चेह-यांशी आपण भिडतो. हल्ली चेह-यांना मुखवटे फासून समाजात पारदर्शी आरश्यासारखी प्रतिमा दाखवण्याचा हा भयावह काळ आहे. माणसं गटा-तटात विभागली गेली. माध्यमे विकल्या गेली. गांधीगिरीचा अस्त होतांना पैसे कमावण्याच्या नादात माफियागिरी पुढे सरकू लागली. 


या काळात बोटावर मोजण्याइतकी काही ठळक मंडळी तत्त्वाने, विचाराने जगत आहेत आणि जगण्याशी संघर्ष करत सर्वसामान्य समाजासाठी लढत आहेत. वळवळ आणि चळवळ हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो. संवेदनशील मनाने सतत कार्यमग्न राहून इतरांसाठी सहज प्रेरणादायी ठरता येत नाही. काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक वर्तमानात रत्नाकर चटप या नावाने कर्तुत्वाची छाप सोडली, याचा गोंडवन मातीला अभिमान आहे. सतत इतरांना सकारात्मक प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाची कहानी तितकीच प्रेरणादायी आहे.

मेरे प्रभो !
मुझे इतनी उचाई कभी मत देना
गैरो को गले ना लगा सकू
इतनी रुकाई कभी मत देना...!

माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या या ओळीप्रमाणे रत्नाकर चटप यांचे व्यक्तिमत्व. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता व पुरोगामी वैचारिक चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. १० जानेवारी १९८३ रोजी त्यांचा जन्म कोरपना तालुक्यातील नांदा या गावी शेतकरी कुटुंबात झाला. माजी आमदार व शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शेतकरी चळवळीतील आंदोलनात बालवयापासून त्यांनी स्वत:ला झोकून दिले. कष्टकऱ्यांच्या घामाला हक्काचा दाम मिळावा, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, वाढत्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. शेती प्रश्‍नांचा चिकित्सक युवा अभ्यासक म्हणून लिखाणाला आणि थेट मर्मावर बोट ठेवून बोलायला सुरुवात केली. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची कारकीर्द तरुणाईसाठी दिशादर्शक ठरली. चंद्रपूरच नव्हे तर विदर्भ व राज्यस्तरावरील नामांकित वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा त्यांनी जिंकल्या. उत्कृष्ट वक्ते म्हणून नावलौकिक मिळवला. याच दरम्यान दै.देशोन्नती व इतर वृत्तपत्रात विविधांगी महत्त्वाच्या प्रश्नांवर संपादकीय लेखन करून वाचा फोडली. ते उत्कृष्ट निवेदक म्हणूनही प्रसिद्ध आहे. आजतागायत जवळपास २०० पेक्षा जास्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा निवेदन करुन ते रसिकप्रिय ठरले. स्पर्धा म्हणजे रत्नाकर चटप हे नाव एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात तसं ठळक कोरल्या गेलं. प्रचंड वाचन आणि विविध क्षेत्रातील लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. यातूनच त्यांना वैचारिक अधिष्ठान मिळत गेले.


वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारांचा व तत्वाचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव. बालपणापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केली. कोरपना तालुक्यात होणाऱ्या बाल सुसंस्कार शिबिरात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. महापुरुषांच्या विचार आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून आपण आपले कर्तव्य पार पाडणे ही नैतिक जबाबदारी आहे, याचे भान रत्नाकर चटप यांना आहे. श्री.रत्नाकर चटप हे सध्या नांदाफाटा येथील श्री.शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यूनियर काॅलेज येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे. मराठीसोबत इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. 


शाळेच्या माध्यमाने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. जिवती तालुक्यातील आदिम कोलाम बांधवांसाठी त्यांनी उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यात सामाजिकता रुजवली. काही वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीला घरी आगीचे चटके लागले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी तिच्या उपचारासाठी जवळपास ५० हजार रुपयांची मदत लोकसहभागातून मिळवून दिली. परिसरातील अशा अनेक प्रसंगात रत्नाकर चटप तन-मन-धनाने नागरिकांच्या पाठीशी उभे राहून कर्तव्यात कसूर करत नाही, ही बाब सामाजिक संवेदना जिवंत ठेवणारी आहे.

रत्नाकर चटप नामांकित कवी, लेखक, वक्ते व साहित्यिक आहेत. 'हुंदका' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे. 'खडतर यात्रेचा वाटसरू' हे व्यक्ती चरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध आहे. राज्यातील विविध मासिके, वृत्तपत्रे, दिवाळी अंकात त्यांचे कथा, कविता, ललित लेखन प्रकाशित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन, राज्य साहित्य संस्कृती संमेलन आधी महत्वपूर्ण संमेलनात निमंत्रित कवी व वक्ता म्हणून त्यांनी परिसराचे प्रतिनिधित्व केले. 


जिल्ह्यातील राजुरा-कोरपणा-जिवती हा आदिवासीबहुल दुर्लक्षित परिसर. याच परिसरात साहित्य व सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे, येथील नव्या लिहिणाऱ्या हातांना बळ मिळावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन २०१० साली अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानद्वारे दुर्लक्षित अशा राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींना एकत्र आणले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कविसंमेलने, चर्चासत्रे घेतली. नवयुवकांची पुस्तके प्रकाशित करुन त्यांना पुढे केले. मागील दशकभरापासून हा परिसर साहित्य व सांस्कृतिक दृष्ट्या अधिक भक्कम व सशक्त करण्याचे श्रेय रत्नाकर चटप यांनाच जाते.


या परिसरात जी नवी पिढी लिहिती झाली, त्यामागे प्रेरणा रत्नाकर चटप यांची आहे. महाराष्ट्रात संत साहित्यातील अभंग हा प्रकार दुर्लक्षित राहू नये म्हणून राज्यस्तरावर अभंग साहित्य संमेलने अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानच्या माध्यमाने त्यांनी घेऊन ऐतिहासिक कार्य केले. तीन राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलने दुर्लक्षित अशा चंद्रपूर जिल्ह्यात घेऊन राज्यातील विचारवंतांना आणून परिसरातील रसिकांना समृद्ध केले. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांची चर्चित अशी 'नाॅनग्रॅन्ट' ही कादंबरी आगामी प्रकाशनाधीन आहे.


रत्नाकर चटप म्हणजे मोठ्या उंचीचा लहान माणूस असा मी आवर्जून उल्लेख करेल. यामागे बरीच कारणे आहेत. ते तालुक्यातील सर्वात मोठ्या नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची कामे त्यांनी आपल्या नांदा गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमाने केली. मात्र त्याचा कधीही गवगवा केला नाही. प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने त्यांच्यातील 'कार्यकर्ता' सतत लोकांसाठी प्रामाणिकपणे खपत असतो. काम करताना तक्रारी येतात- जातात, मात्र त्यांनी शांत व संयमीपणाने दुर्लक्ष करत आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. लोकांसाठी कामे करून घेतले. काम करूनही कधीही 'हे काम मी केलं' असा शब्द त्यांच्या मुखातून निघत नाही, हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य इतर लोकप्रतिनिधीसाठी नक्कीच शिकण्यासारखे आहे. निस्वार्थी, निगर्वी, निष्कलंक, व्यसनमुक्त अशा अभ्यासू समाजभान जपणाऱ्या बहुयागामी व्यक्तिमत्त्वाने नांदा गावाच्या विकासासाठी दिलेले योगदान दखलपात्र तितकेच महत्त्वपूर्ण आहे. इतरांविषयी मनात तळमळ आणि कळवळा जिवंत ठेवून विविधांगी कलाकौशल्य निपून असताना देखील ते सर्वसामान्य माणूस म्हणून वावरतात, हा त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा पैलू आहे.


खरेतर रत्नाकर चटप या नावाला एक वेगळे वलय आहे. गिरीश गांधी यांना जसे आपण विदर्भाचे सांस्कृतिक मंत्री म्हणतो, तसे रत्नाकर चटप यांना आपल्या परिसराचे सांस्कृतिक मंत्री म्हणायला हवे. कारण या परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व वैचारिक कार्यक्रमाच्या निर्मितीत त्यांचा आजवर मोठा हात राहिला आहे. ते ग्रामदूत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. कोरपना तालुका प्रेस क्लबचे पदाधिकारी आहेत. महत्वाचे म्हणजे समाजसेवक डॉ.गिरधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. या माध्यमातून परिसरात ते दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मॅरेथॉन, ग्रामस्वच्छता अभियान, फटाकेमुक्त दिवाळी, राज्यातील सामाजिक क्षेत्रातील नामांकित कार्यकर्त्याला जीवन गौरव पुरस्कार तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष योगदानासाठी पुरस्कार देऊन, कार्यक्रम आयोजित करून ते सन्मानित करतात. या माध्यमातून परिसरात मोठ्या प्रमाणात सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक जाणिवा रुजवण्याचे काम रत्नाकर चटप हे सातत्यपूर्ण करत आहे.



मला आठवते, मी नवव्या वर्गात असताना या व्यक्तिमत्वाची ओळख झाली. माझं गाव बिबी आणि त्यांचं नांदा. दोन किलोमीटरचं अंतर. या व्यक्तिमत्वामुळे खरेतर माझ्यासारख्या फाटक्या सर्वसामान्य पोराला परिसस्पर्श झाला असं मी म्हणेल. माझ्यासह अनेक तरुणांना रत्नाकर चटप यांनी केवळ दिशा दिली नाही तर खऱ्या अर्थाने घडवलं. मात्र याचे श्रेय त्यांनी कधीच घेतले नाही. मी अभिमानाने इथे नमूद करेल, एका कार्यक्रमाचं त्यांच्याकडे निवेदन होतं, त्यांनी स्वतः एक पाऊल मागे घेत पहिल्यांदाच जाणीवपुर्वक मला पुढे करत संधी दिली. वाचायला पुस्तके दिली. शिक्षणात उभं केलं. आत्मविश्वास दिला. आज मी लिहितो, बोलतो याची पालंमूळं मात्र या व्यक्तिमत्वाने खोलवर रुजवली. असे विविध माध्यमाने अनेक तरुणांना त्यांनी बळ दिलं. हा माणूस सतत आपल्या मनाची निर्मळ श्रीमंती समाजाला देतो आहे, मात्र त्याचा उल्लेख कधीही कुठे सापडत नाही.


रत्नाकर चटप हे सजग पत्रकार आहे. मागील १२ वर्षापासून ते आघाडीच्या लोकमत दैनिकात समाजातील विविध प्रश्नांवर लेखन करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना श्रमिक पत्रकार संघाच्या नामांकित पुरस्काराने देखील गौरव करण्यात आला. तरुण भारत प्रेस, राजुरा तालुका पत्रकार संघाचा नुकताच ग्रामीण वार्ता पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान झाला. त्यांना सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक योगदानासाठी शेकडो जिल्हा, विदर्भ व राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सध्या पुरस्कार विकत घेण्याचा काळ आहे. या काळात पुरस्कारापेक्षा कामाला अधिक महत्त्व देत व सर्वसामान्यांना प्रोत्साहन देत रत्नाकर चटप यांनी प्रामाणिकपणे काम केले, त्याला निश्चितच तोड नाही. या कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम करताना ते स्वत: कोरोना बाधित झाले. मात्र तरिही त्यांनी त्यांचे काम सुरुच ठेवले. यातून त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठळक होतो.

हल्ली ग्लोबल जगाची भाषा करताना आपल्याला 'लोकल' होता यावं. विविध क्षेत्रात भरारी घेताना पाय जमिनीवर असावे. जगण्याला विवेकाची भाषा असावी. अडत्याला आणि पडत्याला हात देत सावरण्याची प्रखर इच्छाशक्ती आतून यावी. विविध क्षेत्रात राजकारण गचकरणासारखं होत असताना आपल्या परिश्रमावर व कर्तव्यावर विश्वास निर्माण व्हावा. आपली मुल्ये, नीतिमत्ता, विषयाच्या खोलात जाऊन पोहता येण्याची धमक खऱ्या अर्थानं आपल्याला 'माणूस' म्हणून परिपक्व बनवते. रत्नाकर चटप हे माणूस म्हणून जगण्याचं रसायन आहे. भूमिका घेऊन जगणारे फार थोडे असतात. यश-अपयश हे गौण असतं. सतत दुसऱ्यांच्या पाठीमागे उभे राहून 'फक्त लढ म्हणा' हा आशावाद पेरणारा विचार मुळात क्रांती घडवणारा असतो. रत्नाकर चटप यांच्या विविधांगी क्षेत्रातील कर्तृत्वाचं मूल्य या गोंडवन भूमीला कस्तुरीसारखा अविरत दरवळणारा सुगंध देणारा आहे, हे तेवढेच खरे !


लेखक -अविनाश पोईनकर, बिबी -७३८५८६६०५९
(लेखक प्रसिद्ध कवी व ग्रामीण विकास चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

Pages