बहुचर्चित प्रतिक्षीत KGF Chapter 2 चा टिझर अखेर रिलीज झाला आहे. केजीएफ मधील मुख्य कलाकार यश भाई (Yash Bhai) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी चित्रपटाच्या टीझरची लिंक शेअर केली आहे. यशच्या वाढदिवशी 8 जानेवारीला हा टीझर रिलीज होणार होता, परंतु काही लोकांनी टिझर लीक केल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांना अधिकृत टीझर एक दिवस अगोदर रिलीज करावा लागला.
KGF 2 चा टिझर अत्यंत पावरफुल असून, तो बघतांना अंगावर काटा उभा राहतो, छाती धडधडायला लागते. टिझर मधील बॅकग्राऊंड म्युझिक सुन्न करणारे आहे. यश, संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांची पात्र दिमाखदार दिसत आहेत. यश याची टिझरमधील एन्ट्री तर लाजवाब आहे. मशीनगनच्या लालबुंद तपतपत्या बॅरलवर सिगरेट पेटवितानाच्या सिनवर थिएटर टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून जाईल हे नक्की.
संजय दत्तने त्यांच्या इन्स्टाग्रामवर KGF 2 चे पोस्टर शेअर केले आहे. त्याचवेळी यशने एका व्हिडिओमध्ये चाहत्यांना सांगितले की, “काही महान व्यक्तींनी टीझर लीक केला होता, त्याचे कारण काय आहे हे मला ठाऊक नाही परंतु मला त्याचा मुळीच त्रास होत नाही. उलट मी त्यांना शुभेच्छा देतो.” सोबतच चित्रपटाचा टिझर धुमधाममध्ये रिलीज करायचा प्लॅन फसल्याने त्यांनी चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.


