दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांकरिता निकराचा लढा देऊन जगाला प्रेम,शांती,आणि समतेची शिकवण देणारे,दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती,नोबेल पुरस्कार विजेते,आणि माझ्यामते "कृष्णवर्णीयांचे बाबासाहेब",भारतरत्न नेल्सन मंडेला उर्फ मॅडीबा म्हणजेच मानवतेच्या क्षितीजावरचा तेजस्वी तारा! हा तारा ज्या "सूर्यापासून" प्रेरणा घेऊन त्यांच्याबद्दल म्हणतो… "गांधीजींच्या विचारांनी दक्षिण आफ्रिकेत फार आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे.त्यांच्या शिकवणीमुळेच वर्णभेदावर मात केली गेली आहे.
ते माझे प्रेरणास्त्रोत आहेत." जगातला सर्वात बुद्धिमान मेंदू म्हणून ज्या महान व्यक्तीची ख्याती आहे ते अलबर्ट आइन्स्टाइन मुक्तकंठाने ज्या व्यक्तीच्या गौरवात म्हणतात "येणाऱ्या पिढ्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण होणार की हाड,मांस,रक्ताने बनलेला असाही कोणता अदभुत व्यक्ती या पृथ्वीतलावर वावरला होता म्हणून!" अश्या महान पुरूषोत्तमाच्या वेगळ्या परिचयाची गरजचं काय?
स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर अनेक ताऱ्यांचा उदय झाला.पण ज्या तळपत्या सूर्याच्या तेजाने भारतभूमीच नव्हे तर अख्खी पृथ्वी तेजोमय,अहिंसामय,शांतीमय झाली! तो महान तेजस्वी क्रांतीसूर्य म्हणजेच "मोहनदास करमचंद गांधी" उर्फ "महात्मा गांधी" उर्फ आपणा सर्वांचे लाडके "बापू".
त्यांचा जन्म २ ऑक्टोबर,१८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला.सत्यमयी,शांतीपूर्ण,धाडसी स्वभाव असलेले करमचंद आणि प्रेमळ,सोज्वळ,सुशील,आणि अतिशय धार्मिक वृत्तीची आई पुतळीबाई (पुतलीबाई) या दाम्पत्याचे गांधीजी ३ रे अपत्य होते.बालपणी ते फार लाजाळू स्वभावाचे होते म्हणून त्यांचे फार मित्र न्वहते.अधिकाधिक वेळ ते एकांतात घालवित असत.पुढे तत्कालीन प्रथे प्रमाणे वयाच्या १३ व्या वर्षीच गांधीजींचा विवाह झाला,सहचारिणी म्हणून साथ लाभला गोकुळदास माखेनजी यांची कन्या कस्तुरबा हीचा.पुढे मोहनदास आणि कस्तुरबा चार अपत्यांचे आई-बाबा बनलेत. असा हा गांधीजींच्या वैयक्तीक जिवनाचा अल्पपरिचय होता.
भारतीयांना इंग्रजांच्या दास्य शृंखलातून मुक्त करणारे व त्यासाठी अविरत झटणारे बापू,सत्य व अहिंसा हे गांधीजींच्या विचारांचे पायाभूत होते."आधी केले,मग सांगितले" हे त्यांच्या कृतीचे व शब्दाचे वैशिष्टये होते.
"बापू तुम्ही एक अथांग सागर तुम्हाला या इवलिश्या लेख रूपी घागरीत मी कसे सामावून घेऊ?"
अर्थातच हे क्रांतिसूर्या,महात्मा,भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा देणाऱ्या महानायका तुमच्या आयुष्यातले एक-एक क्षण म्हणजे पाऊलोपाऊली केलेल्या संघर्षाची गाथा,ही अफाट गाथा निव्वळ दोन शब्दरूपी निबंधातून लिखित करणे म्हणजे मोठे आव्हानचं!...
असं म्हणतात "जग नेहमी उगवत्या सूर्याला नमन करते!". मग ही गोष्ट नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे की एखाद्या व्यक्तीला या जगात येऊन १५१ वर्षे पूर्ण झाली असून,व जगाचा निरोप घेऊन ७२ वर्षे लोटून गेल्यावर देखील आजही त्या व्यक्तीचे आचार,विचार समाजमनावर,अगदी तळा-गाळातील माणसापासून तर बलाढ्या राष्ट्रांमधील नेत्यांपर्यंत प्रभावी ठरतात,अश्या व्यक्तीच्या गौरवात कोणती स्तुतिसुमने अर्पण करावी? हा प्रश्न मोठमोठ्या साहित्यिकांना देखील सतावत असणार!
तरी कुबेरसंपत्ती इतक्या प्रतिभेचे धनी असलेल्या जगभरातील वेगवेगळ्या साहित्यिकांनी,वेगवेगळ्या भाषेत बापूंसाठी कविता रचल्या,त्यांच्या आयुष्यावर कथा,कादंबऱ्या लिहील्या.जगभरातील ख्यातनाम दिग्दर्शकांनी गांधीजींच्या आयुष्यावर १०१ चित्रपट तयार केलेत.बापूंवर आधारित हिंदी सिनेसृष्टीत अनेक गाणी निर्माण झाली, पण हिंदी चित्रपट "जागृती" चे 'साबरमती के संत तूने कर दिया कमाल...' या गाण्याने रसिकमनांच्या हृदयात एक वेगळेच अजरामर स्थान निर्माण केले.कवी प्रदीप रचित हे गाण निव्वळ एक गाण नाही तर भारतीयांकरिता परमेश्वर समान असलेल्या परम पूज्य बापूंकरिता एक आरतीचं आहे!
परंतु मोहन पासून महात्मा बनण्याच्या प्रवासाची सुरूवात आता कुठे होणार होती.मोहनदासच्या मनात ती क्रांतीची ठीणगी तेव्हा पेटली जेव्हा एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा योग आला. ७ जून,१८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पिटरमॅरिट्जबर्ग या रेल्वेस्थानकावर कृष्णवर्णीय असून फस्ट क्लासच्या रेल्वे डब्ब्यात बसल्या बद्दल गांधीजींना एका गोऱ्या टि.सी. ने रेल्वेतून खाली ढकलून दिले.त्या अपमानाची जखम बापूच्या हृदयाला अशी खोलवर जडली की समोर बापूंनी केलेल्या पराक्रमांची इतिहासाला सुवर्णअक्षरांनी नोंद घ्यावीच लागली! असं म्हणतात कुणाचाही अपमान करू नये,सर्वांशी प्रेमाने वागावे.कारण त्या अपमानाच्या ठिणगीचे रूपांतर कधी क्रांतीच्या वणव्यात होणार हे सांगता येत नाही! इतिहास ग्वाही देतो जगभरात मानवी हक्कांकरिता जिथे कुठे क्रांती घडून आल्या त्याच्या मुळाशी युगानुयुगे चालत आलेला "अपमान" हेच कारण होते! दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीय अत्यंत वाईट व अन्यायकारक अवस्थेत जिवन जगत होते.त्यांच्यावर अनेक अटी व निर्बंध लादण्यात आले होते.मूलभूत नागरी हक्क देखील त्यांना नाकारण्यात आले होते.
"न्याय" ही संकल्पना बापूंच्या अंगाप्रत्यंगात मुरलेली असल्याने,दक्षिण आफ्रिकेच्या वसाहतीत राहणाऱ्या हिंदी लोकांवर होणारा अन्याय,वंशभेद,अवमान पाहून त्यांचे सात्विक मन बंड करून उठले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी आटोकाट प्रयत्न करण्याचे मनी धरले.इ.स. १९०६ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या राजवटीने आशियाई लोकांची अप्रतिष्ठा करणारा "एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट" हा जुलमी कायदा संंमत करून घेतला.या कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील आशियाई लोकांवर आपली नोंदणी करून घेण्याची व नोंदणीपत्रावर अंगठा करण्याची सक्ती केली.या काळ्या कायद्याविरूद्ध गांधीजींनी सत्याग्रह पुकारून आवाज उठविण्यात पुढाकार घेतला.पुढे बऱ्याचदा वापरलेल्या सत्याग्रह या शस्त्राचा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत प्रथमच केलेला प्रयोग यशस्वी झाला.दक्षिण आफ्रिका सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला.दक्षिण आफ्रिकेत गांधीजी गरिबांचे हिरो ठरले!अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना देदीप्यमान यश मिळाले.
१ ऑगस्ट,१९२० रोजी लो.टिळकांच्या मृत्यूने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक पर्व संपले. नेमस्तांचे राजकारण ना.गोखले आणि फिरोजशाह मेहता यांच्या मृत्यूने काँग्रेसच्या जहालवादी राजकारणाचीही अखेर झाली.१९१५ साली म.गांधी आपले दक्षिण आफ्रिकेतील कार्य संपवून हिंदुस्थानात आले,आणि त्यांनी लगेचच भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीस हात घातला.ना.गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरू होते,असे मानले जाते.टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर गांधीजींचा प्रभाव राहिला,म्हणून १९२० नंतरच्या स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडास "गांधी युग" (Gandhi Era) असे म्हटले जाते.याच वेळी युरोपमध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले.त्यात ब्रिटिश सरकारला सर्व सहकार्य करण्याची गांधीजींनी भूमिका घेतली,परंतु ब्रिटिश लोक मात्र बिहारमध्ये चंपारण्य जिल्ह्यातील युरोपियन मळेवाल्यांनी चालविलेल्या निळीच्या मळ्यातील मजुरांची पिळवणूक शांतपणे पाहत होते.त्याविरूद्ध इ.स.१९१७ मध्ये गांधीजींनी लढा दिला.१९१८ ला अहमदाबाद मधील गिरणी मालक व गिरणी कामगार यांच्यातील वादात गांधीजींनी १९१८ मध्ये लक्ष घातले.गांधीजींच्या आयुष्यातील हा पहिला उपोषण सत्याग्रह होता.त्यानंतर इ.स.१९१८ मध्ये गुजरातेतील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला.याच वेळी सरदार वल्लभभाई पटेल आपली भरपूर पैसा मिळवून देणारी वकिली सोडून गांधीजींच्याबरोबर प्रथमच सत्याग्रहात उतरले. या सत्याग्रहामुळे भारतीय जनता गांधीजींना ओळखू लागली.गांधीजींनी सत्याग्रहींना ग्रामीण भागातील लोकांचे दारिद्र्य व दयनीय जीवन पाहण्यासाठी खेड्याकडे जाण्याचा आदेश दिला.त्यांनी सामान्य माणसाच्या हृदयात राष्ट्रभावना जागविली व हाताने कातलेले सूत व विणलेले कापड अशा 'खादी'शी राष्ट्रभावनेचा धागा जोडला.गांधीजी 'श्रमप्रतिष्ठा व स्वावलंबन' याचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी दररोज नियमाने ते स्वत: सूतकताई करीत असत.सत्याग्रह व असहकार या साधनांद्वारे राष्ट्रीय चळवळीत नवीन प्राण भरला होता.खिलाफत व असहकार चळवळ या दोन्ही भिन्न बाबींची गाठ जुळवून त्यांनी हिंदू-मुस्लीम एकि व मुस्लीम बांधवांस राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आणण्याचे सत्कर्म केले.त्याचप्रमाणे असहकार चळवळीच्या निमित्ताने हिंदू,मुस्लीम,शीख,ख्रिश्चन,शेतकरी,कामगार,भांडवलदार,आदिवासी,स्त्रिया,मुले,विद्यार्थी इत्यादींना समाजातील सर्व घटकांना आपल्या हक्कासाठी ब्रिटिश वसाहतवादाविरूद्ध लढावे लागेल याची जाणीव त्यांच्यात निर्माण केली.गांधीजींच्या चळवळीचा प्रभाव वाढल्यामुळे सुमारे ९० हजार विद्यार्थांनी शाळा-महाविद्यालये सोडली आणि नव्याने स्थापन झालेल्या सुमारे ८०० नवीन राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा व महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.आचार्य नरेंद्र देव,चित्तरंजन दास (सी.आर.दास),लाला लजपत राय,झाकिर हुसेन,सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन झाल्या.त्यात काशी विद्यापीठ,बिहार विद्यापीठ,गुजरात विद्यापीठ,अलीगढचे जामिया मिलिया शिक्षण संस्थांचा समावेश होता.पं.मोतीलाल नेहरू,सी.आर.दास,सी.राजगोपालाचारी,जवाहरलाल नेहरू,सैफुद्दीन किचलू,वल्लभभाई पटेल,असफ अली,टी.प्रकाशम आणि राजेंद्र प्रसाद या प्रख्यात वकिलांनी गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन वकिली सोडून राष्ट्रीय चळवळीत उडी घेतली.आयात परकीय कापडाची जाहीरपणे होळी करण्यात आली,त्यामुळे त्याची आयात निम्म्याने कमी झाली.पिढ्यानपिढ्यांपासून "चूल आणि मूल" व "उपभोग्य वस्तू" म्हणून ज्या स्त्रियांची समाजाने अवहेलना केली,समाजातील त्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच साशंकतेने बघितले,त्या स्त्रियांनी देखील गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन दृष्ट समाजाने लादलेली कृत्रिम चौकट मोडून स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी मारली. त्यापैकी काही वीर स्त्रियांची नावे आहेत अवंतिकाबाई गोखले,आनंदीबाई वैशपायन यांनी चंपारण्याच्या सत्याग्रहात गांधीजींना सहकार्य केले होते. अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींवर "गांधीजींच जीवन" नावाचं एक पुस्तक लिहीलं होत.मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेस मुंबई येथे अवंतिकाबाई गोखले,आनंदी वैशपायन,आणि कमलादेवी चटोपाध्याय या स्त्रियांनी गांधीजींपासून प्रेरणा घेऊन सत्याग्रहाचे नेतृत्व केले,यात एक विशेष घटना अशी घडली होती की कमलादेवी चटोपाध्याय यांनी स्टोव्हवर मिठ तयार केले आणि मुंबई हायकोर्ट मध्ये जाऊन तिथल्या ब्रिटीश न्यायाधीशाला त्या म्हणाल्या "स्वातंत्र्याच मीठ घेऊ इच्छिता काय?"
सरोजिनी नायडू यांनी तर पाऊलापाऊलांवर गांधीजींना सहकार्य केले.दुसऱ्या गोलमेज परिषदेसमवेत अनेक चळवळींमध्ये त्या गांधीजींबरोबर शामिल झाल्यात.
खरतर गांधीजींचे महत्त्व निव्वळ भारतीय स्वातंत्र्य लढ्या पूर्ते मर्यादित राहत नाही,स्वातंत्र्यासोबतच स्त्री उध्दार,अस्पृश्यता निवारण,स्वदेशीचा प्रसार प्रचार,राजकीय,सामाजिक बदल,राष्ट्राचा विकास,मनुष्याचा विकास अश्या अनेक बाबींवर गांधीजींनी कार्य केले आहेत.स्त्री-उद्धाराची चळवळ हाती घेऊन,स्वातंत्र्याची एक आगळीवेगळी,बहूमुल्यीय अशी व्याख्या करणारा महात्मा क्वचितच कुणाला लाभेल,स्वातंत्र्याची व्याख्या करतांना ते म्हणतात "'The day when a woman can walk freely at midnight on the roads, that day we can say that India achieved independence."
अस्पृश्यता निवारण आणि दलितोद्धाराकरिता निकराचा लढा देणाऱ्या बापूंनी एका अस्पृश्य मुलीला दत्तक घेतले होते.त्यांनी निर्माण केलेला "हरिजन सेवक संघ" आणि "हरिजन" नामक मुखपत्र अस्पृश्यांच्या सेवेस वाहिलेले उपक्रम होते.मला पुढचा जन्म मेहतर समाजात मिळाला तर आनंदच होईल,असेही गांधीजी म्हणाले होते.हरिजनसेवेची त्यांनी प्रत्यक्ष कृती करीत हरिजनवस्तीत जाऊन तेथील स्वच्छतागृह (संडास) साफ केले होते!
इ.स.१९२० च्या सुमारास गांधीजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी झाले.तेथपासून इ.स.१९४७ मध्ये भारत स्वतंत्र होईपर्यंत गांधीजींनीच चळवळीचे नेतृत्व केले.म्हणूनच मी अगोदर असे नमूद केले होते की या कालखंडास "गांधी युग" असे म्हणतात.या कालखंडात गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९२० ची "असहकाराची चळवळ",१९३० ची "सविनय कायदेभंगाची चळवळ" व १९४२ ची "चले जाव चळवळ" या तीन चळवळी ऐतिहासिक ठरल्या.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींनी सिंहाचा वाटा उचलला.स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीची वाट फार खडतर व जीवघेणी होती,पण गांधी नावाच्या "आंधीला" कुठलेच भय व कुठलीच चिंता न्वहती! स्वातंत्र्य लढ्याच्या काळात,आणि दक्षिण आफ्रिकेत देखील गांधीजींना बऱ्याच वेळा तुरूंगवास भोगावा लागला.असं मानल्या जाते की गांधीजींनी त्यांच्या एकूण आयुष्याचा २,३३८ दिवस तुरूंगात घालविले आहेत!
विन्स्टन चर्चिल हे गांधीजींच्या एकूण कारकिर्दीच्या काळात त्यांचे कडवे टिकाकार होते.त्यांनी गांधीजींना "अर्धनग्न फकिर" म्हणून देखील संबोधले होते.सन १९४३ ला जेव्हा गांधीजी इंग्रजांविरोधात उपोषणावर बसले होते तेव्हा त्यांनी सलग २१ दिवस अन्नग्रहण केले नव्हते!आश्चर्याची बाब ही की ब्रिटिश सरकारने खास एका आहारतज्ज्ञाला बोलावून गांधीजींची तपासणी घ्यायला सांगितले होते आणि या रहस्यापासून पडदा उठवायला सांगितले होते की "एखादा माणूस सलग इतक्या दिवस बिना अन्नाचा कसा काय जिवित राहू शकतो?".घाबरलेल्या ब्रिटीश सरकारने "लंडन प्रेस" वर बंधन लादली होती की त्यांनी गांधीजींच्या अशक्त शरीराचे छायाचित्र प्रकाशित करू नये,असे केल्याने जनतेच्या मनात संतापाची लाट पसरून स्वातंत्र्याची मागणी आणखी जोरदारपणे होऊ शकते,अशी ब्रिटिश सरकारच्या मनात धास्ती भरली होती! खरचं किती आश्चर्याची गोष्ट आहे!अंगावर साधीशी धोती नेसलेला,चालण्याकरिता काठीचा सहारा घेतलेला एक वयोवृद्ध माणूस,ज्याच्या हातात न कोणते शस्त्र आहे ना कोणते अस्त्र आहे! चेहऱ्यावर राग नाही,मुखात शिविगाळ नाही! त्याच्या जवळ रामबाण उपाय म्हणून आहे निव्वळ एकच ब्रम्हास्त्र तेच म्हणजे सत्याग्रह! आणी या अश्या म्हाताऱ्यासमोर अख्खी ब्रिटीश सरकार नथमस्तक होते!गांधीजींचे याहून दुसरे मोठे वैशिष्टय काय सांगावे नि काय बोलावे?
येथे "गांधी विचारांचा जगावर परिणाम" या विषयावर चिंतन करण्याअगोदर "गांधी विचारांचा भारतावर,भारतवासियांवर परिणाम" या विषयाची चर्चा करणे देखील मला अत्याधिक महत्त्वाचे वाटते.कारण एक अलौकिक,अद्वितीय असे व्यक्तिमत्व असलेले गांधीजी ज्यांच्या विचारांना अख्ख्या विश्वाने सलाम केले.परंतु काय दुर्भाग्य की त्याच्यांच मायभूमीतील ५ % मूर्ख,अज्ञानी लोक गांधीजींचा अनादर करतात! स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचा सिंहाचा वाटा होता असे म्हणता बरोबर नाक मुरडतात.पण या वाक्याचे अधिकृत स्पष्टीकरण मी गांधींवर आधारित एका नाटकातील संवादांच्या मार्फत देऊ इच्छिते,एका नाटकातील "नवनीतसिंह" हे पात्र जेव्हा गांधीजींच्या सत्याग्रह या "शस्त्रावर" संशय व्यक्त करून टिकास्त्र सोडतो आणि झटपट स्वातंत्र्य मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे युद्ध सांगतो तेव्हा नाटकातील एक गांधीवादी पात्र "परमजीत" उत्तरतो "गांधीजींना सुशिक्षित ब्रिटीशांच्या न्यायबुद्धिवर पूर्ण विश्वास आहे.आणि हिंसेचा वापर करून स्वातंत्र्य मिळवूनही घेतले तर उद्या चालून कोणी दुसरे आपल्यावर राज्य करणार.आणि हिंसेच्या फुसक्या बळावर मिळविलेले स्वातंत्र्य आपणास अश्या एका घातक समाजाकडे घेऊन जाणार ज्याचा पायाच हिंसेने रचलेला आहे.जे कोणत्याच राष्ट्राकरिता किंवा समाजाकरिता योग्य नाही.आणि भारतासारख्या बहुधर्मिय,बहुजातिय राष्ट्राकरिता तर अजिबातच योग्य नाही!". सदसदविवेकबुद्धिने विचार केला तर नाटकातील या संवादांमधून गांधीजीचा दूरदृष्टीकोण,आणि काळाच्या पुढचे विचार स्पष्ट होतात!आणि ते किती अष्टपैलू असे व्यक्तिमत्त्व होते हे दिसून पडते.बऱ्याच लोकांची "मुख में राम और बगल में छुरी" अशी वृत्ती असते पण "प्राण जाये पर वचन न जाये" वाली रामवृत्तीचे अनुकरण करणारे बापू मात्र जे वाणीत तेच कृतीत या नियमाचे तंतोतंत पालन करीत होते! निसंदेह,भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वदेशीचा पुरस्कार करण्या हेतू प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करता जॉर्ज फ्रेझर या ब्रिटिश व्यापाऱ्याच्या परकीय कापडांनी भरलेल्या ट्रकला अडवितांना स्वत:च्या प्राणाशी आहुती देणाऱ्या बाबू गेनू पासून ते नेताजी सुभाषचंद्रजी बोसपर्यंत प्रत्येकाचेच योगदान त्या त्या परिने सर्वश्रेष्ठ ,अतुलनीय आहे!परंतु हे देखील सुर्यप्रकाशाच्या अस्तित्वाइतकेच सत्य आहे की महाभारतात जर का पाच पांडवांना श्रीकृष्णाचे मार्गदर्शन लाभले नसते तर संभवता पांडवांना विजय मिळविणे कठीण झाले असते! अगदी त्याच प्रमाणे या अजरामर,क्रांतिकारी स्वातंत्र्य लढ्याला जर का गांधीजींसारख्या अवलियाचे अनमोल नेतृत्व तथा मार्गदर्शन लाभले नसते तर भारतीय स्वातंत्र्य लढा एका नेतृत्वहीन,दिशाहीन युद्धाप्रमाणे लढला गेला असता.व रक्ताचे सडे सांडवून,हिंसक मार्गाने आपण जर का स्वातंत्र्य मिळविले देखील असते तरी ते स्वातंत्र्य किती हितकारी ठरले असते? याबाबत मनात साशंकता निर्माण होतेय.म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींची सिंहाचा वाटा असल्याच्या भूमिकेचे महत्त्व कधीही नकारता येणार नाही!
नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्यूथर किंग जुनिअर ही दोन व्यक्तिमत्व म्हणजे आजीवन मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या क्रांतीचा नुसता स्वरच नव्हे तर आगाज आहेत!ही दोन्ही व्यक्ति गांधीजींना आपले प्रेरणास्त्रोत मानत.गांधीजींच्या "सत्याग्रह" या अलौकीक,अदभुत शस्त्राचे नेल्सन मंडेलांना विशेष कौतुक वाटतं.समोर कृष्णवर्णीयांसाठी लढा देतांना त्यांनी गांधीजीच्यांच पाऊलखुणांवर पाऊलं टाकत यश प्राप्त केले!
"जर तुम्ही उडू नाही शकत तर धावा,धावू नाही शकत तर चाला,आणि जर चालू पण नाही शकत तर रांगा, पण थांबू नका!" क्रांतीचा नुस्ता स्वरच नाही तर आगाज असलेला हे व्यक्तिमत्व म्हणजे मार्टीन लूथर किंग जुनिअर! गांधीजींना आदर्श मानून उभे आयुष्य मानवी हक्कांकरिता लढणारे व योगायोगाने ज्यांच्या आयुष्याचा शेवट देखील गांधीजीप्रमाणे झाला ते मार्टीन लूथर किंग जुनिअर गांधीजींबद्दल म्हणतात,"शांतता आणि सौहार्दाच्या जगात विकसित होत असलेल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून गांधी जगले, विचार केले आणि वागले. आम्ही आपल्या जोखमीवर त्याकडे दुर्लक्ष करू शकतो." १९५९ मध्ये,जेव्हा मार्टीन लूथर किंग गांधीजीच्या समाधीस्थळी अर्थात राजघाटला आले होते तेव्हा गांधीजींच्या पावन स्मृतीवर पुष्पवंदना करतांना त्यांचे डोळे पाणावून गेले होते!
भारतीय साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेली नोबेल पारितोषिक विजेती महान कादंबरी "गीतांजली" चे रचनाकार महान लेखक,कवी गुरूदेव रवींद्रनाथ टागोर गांधीजींच्या विचारांपासून विशेष प्रभावीत झाले होते.ते गांधीजींचे शुभचिंतक होते.त्या दोघांमध्ये बऱ्याच सामाजिक,राजकीय विषयांवर चर्चा व्हायच्या.१९१५ साली जेव्हा गांधीजी रवींद्रनाथ टागोरांना भेटायला "शांती निकेतन" येथे गेले तेव्हा त्यांनी टागोरांना "नमस्कर गुरूदेव" म्हणून संबोधले.यावर टागोर म्हणाले,"जर मी गुरूदेव आहे तर तुम्ही महात्मा आहात." तेव्हापासूनच रवींद्रनाथ टागोरांना "गुरूदेव" आणि गांधीजींना "महात्मा" संबोधले जाऊ लागले.
गुरूदेव गांधीजींच्या सन्मानार्थ म्हणतात, "महात्मा गांधी आले आणि भारतातील निराधार कोट्यावधी लोकांच्या दारात उभे राहिले, त्यांच्यापैकी एक जण त्यांना स्वत: च्याच भाषेत बोलतांना बोलला ...इतर कुणाला इतके अनधिकृतपणे भारतीय लोकांचे मांस आणि रक्त म्हणून स्वीकारले आहे ....
सत्याने सत्य जागृत केले!."
याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा गांधीजींना "राष्ट्रपिता" म्हणून संबोधित केले होते.
नोबेल पुरस्कार विजेते दलाई लामा म्हणतात,"गांधीजींना स्मरणात ठेवायचा सर्वाेत्तम मार्ग हाच आहे की आपण आपल्या दैनंदीन जीवनात त्यांनी सांगितलेल्या शांती,अहिंसा आणि साध्या राहणीमानाचे अनुकरण करावे" सन १९८९ मध्ये जेव्हा दलाई लामांना शांततेचा नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तेव्हा ते म्हणाले होते की हा नोबेल पारितोषिक मी माझे गुरू महात्मा गांधीजींना समर्पित करितो.
महात्मा गांधींना १९३७,१९३८,१९३९,१९४७ आणि अखेरदा सन १९४८ ला, असे पाच वेळा शांततेच्या नोबेलकरिता नामांकीत केले होते पण "अहो दुर्भाग्य नोबेल पुरस्काराचं!" की त्याला गांधीजींपर्यंत पोहोचता आले नाही! १९४८ ला नोबेलसाठी नामांकीत झाल्याच्या काही दिवसानंतरच गांधीजींची हत्या करण्यात आली होती.त्यावेळी अशी मान्यता होती की "कुठल्याही मृत व्यक्तिला नोबेल पारितोषिक दिले जाऊ नये".पण नोबेल समितीने गांधीजींच्या सन्मानार्थ त्या वर्षी म्हणजेच सन १९४८ ला इतर कुठल्याच व्यक्तिला नोबेल पुरस्कार दिला न्वहता.ही नोबेल समितीकडून गांधीजींना एक आगळीवेगळी श्रद्धांजली होती!"टाईम" या जगविख्यात प्रतिष्ठीत मॅगझीनने सन १९३० साली आपल्या मुखपृष्ठावर गांधीजींचे छायाचित्र प्रकाशित करून त्यांचा एक आगळावेगळा सन्मान केला होता."टाईम" या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकणारे महात्मा गांधी हे पहिले भारतीय होते! गांधीजींच्या नावी असे बरेच कौतुकास्पद रेकॉर्ड आहेत जसे की गांधीजी एक महान लेखक होते त्यांनी ५०,००० पृष्ठांहून अधिक लेखन केलेले होते.विकीपिडीया वर गांधीजींची आत्मकथा १७० हून अधिक भाषांमध्ये लिहील्या गेली आहे.आणि संभवता याचे प्रमाण दुसऱ्या इतर कुठल्यापण भारतीयाच्या तुलनेत जास्त आहे! गांधीजींची स्वलिखित ,मुळ गुजराती भाषेतील आत्मकथा "माझे सत्याशी प्रयोग" हीला २० व्या शतकातील १०० प्रभावशाली आध्यात्मिक पुस्कांमध्ये जागा देण्यात आली आहे!ही पुस्तक जवळपास प्रत्येकच भाषेमध्ये अनुवादीत झालेली आहे.
व्यक्तिला व्यक्तिगत जीवनात व राष्ट्राला राष्ट्रीय जीवनात पुढे नेऊन त्याची उन्नती साधून देण्याचे अजोड सामर्थ्य,गांधीजींच्या सर्वच राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक व व्यक्तिनिष्ठ अशा सर्व क्षेत्रातील तरलस्पर्शी विचारांमध्ये आहे.त्यांच्या विचारांचा भारतीय जनमानसांवर फार मोठा व खोलवर प्रभाव पडला होता.त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वसामान्य जनतेनेही स्वातंत्र्याच्या लढ्यात वेळोवेळी भाग घेतला.हजारो देशभक्त त्यांच्या शब्दासाठी देशाकरिता प्राणार्पत करण्यास तयार झाले होते.गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या नेत्यांची एक महान परंपरा या देशात तयार झाली.गांधीजींच्या विचारांना जगमान्यताही मिळाली.
आजही स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची मुल्ये,राजकीय,सामाजिक इ. तत्वे व विचारसरणी यांचा पाया गांधीजींचे विचार हाच आहे.गांधीजीच्या विचारांमध्ये असणारी तत्वनिष्ठा व मूल्यनिष्ठा ही व्यक्तिला व राष्ट्राला आंतरिक सामर्थ्य देणारी आहे.
अहिंसा व सत्य या परस्परपूरक तत्वांचा जितका व्यक्तिगत जीवनात अंगीकार करावयास हवा तितकाच तो राजकीय बाबींमध्ये पण करावयास हवा असे गांधीजींनी सर्वप्रथम प्रतिपादन केले.याच तत्वांवर आधारित असणाऱ्या सत्याग्रहाचा शस्त्रासारखा वापर करून अहिंसक मार्गाने त्यांनी राजकीय चळवळी यशस्वी केल्या.त्यासाठी त्यांनी सविनय कायदेभंग,असहकार,बहिष्कार,शासकीय आ भंग,उपोषण,धरणे,इ. सत्याग्रहाचे मार्ग अवलंबिले.
सत्य व अहिंसा हे गांधीजींच्या विचारांना पायाभूत आहेत.तरी गांधीजींना दुर्बलांची अहिंसा अभिप्रेत न्वहती.त्यांच्या मते अहिंसा हा वीराचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.भित्र्याचा नव्हे.गांधीजींनी सत्य हे साध्य आणि अहिंसा हे त्याप्रत जाण्याचे साधन मानले होते.त्यांनी या दोन्ही तत्त्वांना समसमान महत्त्व दिले होते.प्रेममय व सहनशील अहिंसेच्या मार्गाने हृदयपरिवर्तन करून शत्रुलाही मित्र बनविता येतो असा त्यांचा दृढ विश्वास होता.गांधीजी साधनशुचितेवरही भर देत.उन्नत व उदात्त साध्याप्रत पोचविणारी साधनेही नैतिक व उच्च प्रतीची असावयास हवी असे त्यांचे म्हणणे होते.भारतातील खेडी ही भारताची नस आहे हे ओळखून गांधीजींनी ग्रामविकासावर भर दिला.प्रत्येक खेडे आर्थिक व राजकीय दृष्ट्या स्वयंपूर्ण असले पाहिजे असे ते म्हणत.त्यासाठी त्यांनी लघुउद्योग,कुटीरोद्योग,यांच्या विकासाचा आग्रह धरला.ग्रामवासीयांनी खेडे सोडून कधीही शहरात जाऊ नये असे ते सांगत.तत्कालीन अनिष्ट सामाजिक रूढी विरूद्धही गांधीजींनी आवाज उठविला.त्या काळी स्त्रिया व अस्पृश्य यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध गांधीजी उभे ठाकले.अस्पृश्यतेच्या प्रथेला ते कलंक समजत.त्या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला.त्यांचे अस्पृश्यता निवारण,स्त्री-शिक्षण,जातीय ऐक्य,प्रौढ शिक्षण,इत्यादी समाजसुधारणेचे विधायक कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीचाच एक भाग बनले.अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करणारा "हरिजन सेवक संघ" त्यांनी इ.स.१९३३ मध्ये स्थापन केला.या प्रश्नावर लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी 'हरिजन' नावाचे साप्ताहिक सुरू केले.गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक कार्यकरत्यांनी अस्पृश्योध्दाराचे कार्य अंगीकारले.मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनासही गांधीजींने मूल्यांचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.अभ्यास,आदर्श मानणे,चारित्र्यसंवर्धन,व्रतनिष्ठा व संयम,परोपकार,श्रद्धा,प्रेम,प्रार्थना,अभय,अनासक्ती,अपरिग्रह,दया,बंधुभाव,सहनशीलता,नम्रता,नियमितपणा,स्वच्छता,नीतिमत्ता,आहार व स्वास्थ्य,क्रोधाचा अभाव व क्षमाशीलता अशा व्यक्तीचा सर्वकष विकास साधून देणाऱ्या विविधांगी मूल्यांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला.देशभक्ती,सर्वधर्मसमभाव,त्याग या मूल्यांची शिकवणही गांधीजींनी दिली.
स्वत: गांधीजींची राहणी अत्यंत साधी होती.गरजेपुरती वस्त्रे,शरीरधारणेसाठी आवश्यक असेल तेवढाच साधा,सात्विक आहार,व्रतनिष्ठा,सत्यनिष्ठा,ही त्यांच्या राहणीची वैशिष्ट्ये होती.महानता,उन्नतता,सूक्ष्मता,तरलस्पर्शिता व व्यापकता ही त्यांच्या समर्थ व प्रेरक विचारांची वैशिष्टये होती.'आधी केले ,मग सांगितले' हे त्यांच्या कृतीचे व शब्दाचे वैशिष्ट्य होते.या सर्व वैशिष्ट्यांनिशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रूपाने या भारत भूमीमध्ये एका युगपुरूषाचा उत्तुंग आदर्श निर्माण झाला.हाच आदर्श या पुढे व्यक्तीला व राष्ट्राला दीपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गदर्शन करीत राहील.
-निकिता शालिकराम बोंदरे.
Email - nikitabondre1234@gmail.com
