पत्रकार दिन विशेष लेख : लोकशाहीची विश्वासार्हता पत्रकारितेमुळे अबाधित : अ‍ॅड. दीपक चटप #reporters-day - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


पत्रकार दिन विशेष लेख : लोकशाहीची विश्वासार्हता पत्रकारितेमुळे अबाधित : अ‍ॅड. दीपक चटप #reporters-day

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


बाळशास्त्री जांभेकर यांना आपण 'दर्पण' वृत्तपत्राद्वारे लोकशिक्षण घडविणारे समाजसुधारक म्हणून आपण ओळखतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी १९ व्या शतकात विधवांच्या पुनर्विवाहावर केलेले लिखाण क्रांतिकारी होते. पुढे या लिखाणाने विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ निर्माण झाली. गोविंद कुंटे व भाऊ महाजन या सहकाऱ्यांचे सहकार्य त्यांना लाभले होते. संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषेंसह ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली, गुजराती इत्यादी भाषांवर देखील त्यांचे असलेले प्रभुत्व विलक्षण होते. या भाषेंसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र, सामन्य ज्ञान इत्यादी विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास होता. द्रष्टे समाजसुधारक, भाषांचे अभ्यासक, विद्वान पत्रकार नावाजलेले लेखक- प्राध्यापक, कुलाबा येथील वेधशाळेचे संचालक अशा नानविध स्तरावर यशस्वी कारकीर्द त्यांनी केली.

पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या संसदेतील भाषणात म्हणाले होते की, “माध्यमांचे स्वातंत्र्य हे फक्त लोकशाहीतील घोषवाक्य असू शकत नाही. कारण माध्यमांचे स्वातंत्र्य हे लोकशाही प्रगल्भ करण्याचे एक महत्वाचे मूल्य आहे”.

आजच्या घडीला सर्वात आव्हानात्मक कोणते क्षेत्र झाले असेल तर ते पत्रकारितेचे क्षेत्र आहे, असे मला वाटते. हा देश ओळखला जातो तो राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे ज्यांनी पत्रकारितेचे स्वातंत्र्य व पत्रकारांचा स्वाभिमान जपण्यासाठी संघर्ष केला होता. 

'सत्यमेव जयते'चा खरा अर्थ न्यायपालिकेनंतर सर्वात जास्त कोणाला उमगला असेल तर तो पत्रकारांना आहे.'सत्यमेव जयते' हे वाक्य कोणी जिवंत ठेवण्याचे काम केले असेल तर ते या देशातील पत्रकारांनी केले आहे. 

या देशाचा इतिहास आहे कि, पत्रकारांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि असे पत्रकार इतिहासात अमर राहिले आहेत हे आपणही जाणता. काय खरं,काय खोटं हे समजून घ्यायचे असेल तर पत्रकारांना बळ दिले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना जेव्हा या देशातील न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे असे वाटले तेव्हा ते सर्वप्रथम पत्रकारांसमोरच आले. हि विश्वासार्हता आजही पत्रकारीतेची टिकून आहे म्हणूनच देशातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रकरांचाच आधार वाटला.

राजकारणी सर्वात जास्त कोणाला घाबरत असतील तर ते पत्रकारांनाच म्हणून हा जो आपला वचक व्यवस्थेवर आहे तो टिकवून ठेवून आपल्या प्रोफेशनचे महत्व अबाधित ठेवणे आता आपल्या हातात आहे. 

२०१७ च्या World Press Freedom अहवालानुसार १८० देशांपैकी भारताचा क्रमांक १३६ वा लागतो तो देखील २०१६ सालच्या तुलनेत तीन क्रमांकांनी घसरला आहे. Palestine व अफगाणिस्थान सारख्या दहशतवादाने पोखरलेल्या देशांचा क्रमांक भारताच्या वर लागतो हि बाब आपल्यासाठी लाजिरवाणी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१६ ते एप्रिल २०१७ दरम्यान पत्रकारांवर ५४ हल्ले झाले आहेत,त्यातील ८ हल्ले हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झाले आहेत. 




आज भारताप्रमाणे जगात देखील पत्रकारांची अवस्था बिकट आहे. तुर्कीमध्ये कुठल्याही चौकशीविना सरकारविरोधी लेखन करणाऱ्या १०० हून अधिक पत्रकारांना जेल मध्ये टाकण्यात आल होत. भारतात सरकारविरोधी बातम्या करणाऱ्या पत्रकारांना वाहिन्यांच्या मालकांवर दबाव आणून काढून टाकण्यात येत आहे. मारून टाकण्यात येत आहे.

शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर सर्वात जास्त हल्ले झालेले आहेत कारण सदर पत्रकार हे राजकारण, भ्रष्टाचार व गुन्हे या विषयांवर स्टोरी करत असतात.यांना रोखण्यासाठी सोशल मिडीयावर पत्रकारांना prostitute म्हणून हिणवले जाते म्हणजे पत्रकारांवारचे हल्ले हे फक्त शारीरिक राहिले नसून मानसिक छळ सुरु झाले आहेत.

फेक न्युजचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. फेक न्यूजच्या वाढत्या प्रमाणाने पत्रकारितेचा चौथा स्तंभ लयाकडे वाटचाल करीत आहे का..? या प्रश्नाचे अंतर्मुख होऊन पत्रकारांनी उत्तर शोधले पाहिजे. 

पत्रकारितेत प्रचंड ताकद असून लोकशाहीतील मूल्य जोपासण्यासाठी नि:पक्ष पत्रकारितेची आवश्यकता आहे. वेब पोर्टल्स, ब्लॉग्स, न्युजलेटर, वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आदींच्या माध्यमातून हे क्षेत्र विस्तारत जात असून प्रसारमाध्यमांतील महत्वाचा दुवा असलेले पत्रकारांचे कौतुक करावे, तितके कमीचं.

अ‍ॅड. दीपक चटप

९१३०१६३१६३

Pages