खबरकट्टा/ चंद्रपूर:
भद्रावती : तालुक्यातील बरांज कोळसा खाणीतील होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे चेक बरांज गावातील घरांना भेगा पडत असून बरांज कोळसा खाण व्यवस्थापनाद्वारे सदर ब्लास्टिंग करीत बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चेकबरांज ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र डोंगे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना देण्यात आले आहे.
बरांज कोळसा खाणीचे उत्खनन चेकबरांज गावालगत सुरू आहे. त्या उत्खनन दरम्यान होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे चेक बरांज गावाला ब्लास्टिंगचे तीव्र धक्के पोहोचत असून घरांची पडझड होत आहे आणि घरांना भेगा सुद्धा पडत आहे. त्यामुळे जीवित, वित्त हानी होऊ शकते. गावात भीतीचे वातावरण निर्माण होऊन गावकऱ्यांच्या - आरोग्यात धोका निर्माण झाला आहे.
कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या खाणीतील व्यवस्थापनविरुद्ध गावकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बरांज खाणीतील चेकबरांज गावालगत होणारी ब्लास्टिंग बंद करण्याबाबतचे आदेश कंपनी व्यवस्थापनाला देऊन ब्लास्टिंग बंद करण्यात यावी, अन्यथा चेकबरांज येथील गावकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन उपसरपंच राजू डोंगे यांनी तहसीलदार भद्रावती व बरांज कोळसा खाणच्या व्यवस्थापक यांना दिले आहे.
