- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल, चक्क लग्नपत्रिकेच्या निमंत्रणाची बाटली आणि चखणा
- चंद्रपूर शहरात 15 डिसेंबर रोजी पार पडले हे लग्न, या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह दारू -चखणा दिला गेल्याचा व्हिडिओ व्हायरल
- चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षापासून आहे दारूबंदी
- स्थानिक बल्लारपूर येथील कुटुंबीय म्हणतात नागपुरात वाटलेल्या काही पत्रिकेत होती दारू-चंद्रपुरात नाही
- पोलिसांपुढे सत्यता पडताळून पाहत कारवाईचे आव्हान
खबरकट्टा / चंद्रपूर :
हा व्हायरल व्हिडिओ आहे चंद्रपुर जिल्ह्यातला आणि या जिल्ह्यात आहे दारूबंदी, तीही सहा वर्षांपासून. मात्र, या दारूबंदीला आव्हान देणारा हा व्हिडीओ एखाद्या बार-हॉटेलच्या उद्घाटनाचा नसून ही लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे.
देशाच्या काही भागात अशा पद्धतीने निमंत्रण पत्रिकांचे चलन असेलही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात याचे वेगळे महत्त्व आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती कागदावर आहे हे सर्वश्रुत आहे.
मात्र याच महिन्याच्या 15 तारखेला चंद्रपूर जिल्हा स्थानी (एनडी हॉटेल )हा विवाह सोहळा संपन्न झाल्याचं निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट होत आहे.
या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह एका छोट्या गिफ्ट बॉक्स मध्ये दारूची बाटली पाणी आणि चखणा असे गिफ्ट पाहुण्यांना पाठविले गेले. निमंत्रण पत्रिकेचा हा व्हिडिओ सध्या वायरल झालाय. एकीकडे दारूबंदीच्या निमित्ताने पोलिसांवर हल्ले होत आहेत.
कोट्यावधी रुपयांची दारू पोलीस जप्त करत आहेत. हजारो आरोपी तयार होत आहेत. ही पत्रिका चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या बल्लारपूर येथील व्यापा-याच्या घरची आहे. त्यांना या वायरल व्हिडीओ विषयी विचारले असता काही निवडक पत्रिका आपण छापल्या होत्या हे त्यांनी कबुल केले.
ह्याच पत्रिका नागपुरात वाटताना त्यात दारू होती मात्र चंद्रपुरात ड्राय फ्रुट होते अशी माहिती दिली. दारू असलेल्या पत्रिकेचा कुणी परिचिताने व्हिडिओ काढला असेल आणि तो वायरल झाला अशी माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर पोलिसांना आता यातील सत्यता पडताळून पाहत कारवाई करण्याचे मोठे आव्हान आहे.
