खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
गडचांदूर येथील विधी अभ्यासक व सामजिक कार्यकर्ते ॲड.दीपक यादवराव चटप यांचे 'कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज' या चर्चीत पुस्तकाचे प्रकाशन आज राजूरा येथील पत्रकार भवन येथे आयोजित राजुरा तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सकाळी ११ वाजता होत आहे.
खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार सुभाष धोटे, शेतकरी नेते व माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सध्या देशात कृषी कायद्याविषयी आंदोलन पेटले आहे. या पार्श्वभूमीवर ॲड.दीपक चटप यांनी कायद्याविषयी सोप्या भाषेत चिकित्सा या पुस्तकात केली आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाश सिंह पाटील यांची प्रस्तावना, प्रख्यात विधिज्ञ ॲड असीम सरोदे व वामनराव चटप यांचे ब्लर्ब या पुस्तकाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण व्हावे, हा मूलभूत विचार या पुस्तकाचे विशेष आहे. नव्या कृषी कायद्यावरील हे पहिलेच पुस्तक आहे. सदर पुस्तक Vachan.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

