मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भाई जगताप यांना मिळालं, त्यानंतर महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष देखील बदल्यात चारुतला टोकस यांच्या जागी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती झाली त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालीला वेग आलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी आजच्या घडीला सर्वात आघाडीवर आहेत.
नुकतेच विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर यांच्या सोबत दिल्ली वारी करून आले.या भेटीनंतर त्यांनी देखील वाहिन्यांना प्रतिक्रिया देतांना, पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण काँग्रेस पक्ष आणखी सक्षम करण्यास प्रयत्नांची पराकाष्टा करू, असे सूचक वक्तव्य केले.
त्या सोबतच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देखील आतापर्यंत पक्ष वाढवा या साठी प्रयत्न केले आणि पुढे आणखी जबाबदारी मिळाल्यास संपूर्ण ताकदीने राज्यात सर्वात मजबूत काँग्रेस पक्ष बनवू असे ट्वीट करून प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सदैव योगदान दिले आहे . यापुढे सुद्धा जर पक्ष श्रेष्ठींनी जबाबदारी दिली तर संपूर्ण ताकदीने काँग्रेस पक्षाला राज्यात सर्वात मजबुत असा पक्ष बनवू . #Congress #Maharashtra
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 13, 2021
त्यामुळे वडेट्टीवार यांचे नाव जवळजवळ निश्चित समजले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळात दुय्यम खाते मिळून देखील विजय वडेट्टीवार यांनी आपल्या खात्याला ओळख प्राप्त करून दिली, सोबतच महाराष्ट्रातुन पक्षनिधी मिळूवून देण्यात ते तिसऱ्या स्थानावर आहेत त्यामुळे आजच्या घडीला विजय वडेट्टीवार यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडी वर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी.वेणूगोपाल यांच्याशी वडेट्टीवार यांची सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भाला मिळणार असे संकेत आहेत, या बातमीमुळे वडेट्टीवार यांच्या हितचिंतकांनी आनंद व्यक्त केला आहे.
