🔰1.54 कोटींचे भांडवल, ना तंत्रज्ञान, ना सामग्री - शून्य अनुभव🔰 20 हजार कोटींचा प्रकल्प कसा उभारणार?
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी येथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी "न्यू इरा क्लिनटेक सोल्युशन" कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वीत्झर्लंडच्या दावोसमध्ये सामंजस्य करार झाला. हा प्रकल्प उभारण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांचे भांडवल लागणार आहे; परंतु न्यू इरा कंपनीकडे या प्रकल्पाकरिता आवश्यक तंत्रज्ञान व पुरेसे भांडवल नाही, तसेच कंपनी केवळ सात महिने जुनी आहे. त्यामुळे कंपनी हा प्रकल्प कसा उभारणार, असा प्रश्न आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत हा करार झाला आहे. ही कंपनी अमेरिकेची असल्याचे सांगितले जात आहे; परंतु ही कंपनी अमेरिकन नसून महाराष्ट्रातील इटखेडा (औरंगाबाद) येथील आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट neweracleantech.com वर कफ परेड, मुंबई चा पत्ता आहे. कंपनीची नोंदणी 2 जून 2022 रोजी झाली आहे. मालकाने 3 कोटी रुपये गुंतविले आहेत तर, समभाग विक्रीतून 1 कोटी 54लाख रुपये मिळविण्यात आले आहेत.
अधिकृत भागभांडवल 3 कोटी आणि पेडअप कॅपिटल 1.54 कोटी रुपये आहे. गोपीनाथ लटपटे, बाळासाहेब दराडे आणि निहित अग्रवाल हे संचालक आहेत. कॉर्पोरेट सर्टिफिकेशन म्हणजेच सीईएन क्रमांक यू 14200 एमएच 2022 पीटीसी 383095 आहे. ही कंपनी 20 हजार कोटींचा कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारणार आहे.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर व त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी कंपनीची पूर्ण माहिती न मिळविताच या प्रकल्पाचे श्रेय घेतले असं दिसतंय , तसेच शरद पवार यांनाही प्रकल्पाचे श्रेय द्यायला ते विसरले नाहीत.
काेणती बॅंक देईल कर्ज?
अवघे साडेचार कोटी भांडवल असलेल्या कंपनीला कोणती बँक 20 हजार कोटी रुपये देईल, हा प्रश्न आहे. कंपनी खनिकर्म व उत्खननाचे काम करत असल्याची माहिती आहे. कंपनीकडे कोल गॅसिफिकेशनचे तंत्रज्ञान नसल्याचे स्पष्ट होते.
याच प्रकल्पामुळे अहिर यांचा पराभव :आठ वर्षांपूर्वी चंद्रपूरचे तत्कालीन भाजप खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भद्रावती येथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचे वचन दिले होते; परंतु त्यांनी ते वचन पूर्ण केले नाही. त्याचा फटका त्यांना बसला. 2019मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.



