चंद्रपुरात ‘अल्लाह हो अकबर’ वरुन नवा वाद : ॲड. फरहान बेग यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार : - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपुरात ‘अल्लाह हो अकबर’ वरुन नवा वाद : ॲड. फरहान बेग यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार :

Share This
चंद्रपूरातील महाकाली देवस्थान मंदिर परिसरात आतंकवादि हल्ल्याचे मॉकड्रील करताना चक्क मुस्लिम समाजाला आंतकवादी म्हणून दाखविण्यात आले. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. तर आंतकवादी झालेल्या पोलिसांनी (Police) ‘अल्लाह हो अकबर’ अशा घोषणासुद्धा दिल्या. या प्रकारावर मुस्लीम समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत,याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर :

या मॉक ड्रिल मध्ये मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि पोलिस शिपाई सहभागी झाले होते. आंतकवाद्यांचा हल्ला मोडून काढण्यासाठी जी यंत्रणा पोलिसांना हवी, त्या सर्वांचा वापर या मॉक ड्रीलमध्ये करण्यात आला. महाकाली मंदिर परिसरात लपलेल्या अतिरेक्यांना अटक करण्यात आली. गोळीबार झाला.बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईनंतर अटकेतील अतिरेक्यांनी अल्लाह हो अकबर अशा घोषणा दिल्या. घोषणा देणारे पोलिसच होते. मॉकड्रीलसाठी त्यांनी अतिरेक्यांची वेशभूषा केली होती. हा धक्कादायक प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोरच घडला.

हा सर्व नाट्यमय प्रकार पोलिसांच्या मॉकड्रीलचा हा एक भाग होता. मात्र, आता मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मॉकड्रीलच्या माध्यमातून विशिष्ट समाजाचेच नागरिक अतिरेकी असतात, असा समज रूढ केला जात आहे. जाणीवपूर्वक समाजात हे पसरविले जात आहे. हा धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न आहे. याला जबाबदार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली.

या शिष्टमंडळात ॲड. फरहान बेग, ॲड. जावेद शेख, ॲड. कल्याण कुमार, ॲड. रफीक शेख, ॲड. दाऊद शेख यांचा समावेश होता. अद्याप पोलिस यंत्रणेने संबंधितांवर कारवाई केली नाही. ही चूक अवधानाने झाली, अशी सावरासावर त्यांच्याकडून केली जात आहे.

मागील काही वर्षांपासून समाज माध्यमांवर विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याचा प्रकार वाढला आहे. त्याचे पडसाद समाजात अनेकदा हिंसक घटनांच्या स्वरूपात उमटले आहे. मात्र, पोलिसांसारखी कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणाच या धार्मिक द्वेषाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

फक्त एकाच धर्माचे नारे का लागले. पोलिस यंत्रणेचा हा प्रकार धक्कादायक आहे. अनवधानाने झाले असेल, पण यातून मानसिकता दिसून आली. हा प्रकार समाजात तेढ निर्माण करणारा आहे - ॲड. फरहान बेग, सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर.

मॉकड्रील पोलिसांची अंतर्गत बाब आहे. एका विशिष्ट धर्माच्या लोकांना अतिरेकी दाखविणे ही अनवधानाने झालेली चूक आहे. संबंधितांना ताकीद दिली आहे. भविष्यात अशा चुका होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल : रवींद्र परदेशी, जिल्हा पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.

Pages