राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मागील 23 वर्षात चंद्रपुरात राष्ट्रवादीचे एकही कार्यालय नाही. काही महिन्यापूर्वी अजित पवार चंद्रपूर दौऱ्यावर आले असता पक्षाचे कार्यालय नसल्याने नाईलाजाने काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली. यावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी ही खंत पवार यांच्यासमोर व्यक्त केली. यावर खासदार धानोरकरांनी हस्तक्षेप करत आपले जुने कार्यालय यासाठी देऊ केले. ठरले मग, धानोरकरांचेच जुने कार्यालय राष्ट्रवादीचे कार्यालय करायचे.
धानोरकर जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळी रामनगर परिसरात मणी बारच्या बाजूला बाळू धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालय होते. मात्र, बाळू धानोरकरांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आणि या कार्यालयाचा वापर बंद झाला. तेव्हापासून हे कार्यालय बंद अवस्थेत आहे. हेच कार्यालय धानोरकर यांनी पवार यांना देऊ केलं.
शब्द तर दिला मात्र नंतर या प्रक्रियेला विलंब होऊ लागला. मात्र अजित पवार ते अजित पवारचं. त्यांचं काम अगदी चोख असल्याने त्यांनी याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. या कार्यालयाची सर्व कागदपत्रे आणि सर्व औपचारिकत याची पडताळणी करण्यात आली आणि अखेर धानोरकरांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नावाने बक्षीसपत्र तयार करून दिले.
धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे याची परतफेड करण्याची संधी धानोरकरांनी देखील सोडली नाही.
मागील आठवड्यात हे बक्षीसपत्र तयार करण्याकरिता खासदार-आमदार दाम्पत्य व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी जिल्हा निबंधक कार्यालयात हजेरी लावली होती. दिवसेंदिवस अनेक स्थायी संपत्ती व व्यवसायाचे निनावी मालकत्व वाढवीणाऱ्या या दाम्पत्याने लाखोंचे बाजारमूल्य असलेली संपत्ती बक्षीस करवी एका दुसऱ्या राजकीय पक्षाला देणे हे अर्थातच भुवया उंचावणारे व भविष्यातील राजकारण व अर्थकारणाचे नवे समीकरण मात्र नक्कीच जमवून आननार असे दिसतेय.परंतु लोकसभा क्षेत्रातील जनता मात्र अजूनही खासदार-आमदाराकडून आपल्या क्षेत्राच्या विकासाकरिता काय स्पेशल बक्षीस मिळेल या प्रतीक्षेतच...