खबरकट्टा / चंद्रपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेंभुर्डे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. मोरेश्वरराव टेंभुर्डे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. राष्ट्रवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आणि शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रोरा- भद्रावती विधानसभेचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मोरेश्वर टेंभुर्डे यांच्यावर अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार आहे. मोरेश्वर टेंभुर्डे यांनी मृत्यूपूर्वी तशी इच्छा व्यक्त केली होती. माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहाला अग्नी देवू नका. माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा, असे त्यांनी आपल्या आप्तेष्टांना सांगितले होते. त्यानुसार टेंभु्र्डे यांच्या इच्छेचा मान ठेवत त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला जाईल.
