सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तीने मारहाण केली त्याचे नाव रामजी हरणे असे आहे. हरणे यांनी याबाबत एक व्हिडीओ जाहीर केला आहे. हा व्हिडीओ 2021 चा असून माझे पैसे धवणे यांनी परत केले. या कृत्याबाबत मी धवणे यांची माफी देखील मागितली आहे. दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ असून तो आता व्हायरल करण्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
चंद्रपुरातील सोशल मीडियावर एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. 43 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करून आपले पैसे देण्याची मागणी करीत आहे. हा व्हिडीओ न्याहाळून पाहिला तर मार खाणारी व्यक्ती दुसरी तिसरी नसून अजय धवणे असल्याचे दिसून येते. तर मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव रामजी हरणे (रा. चंद्रपूर) असे आहे.
अजय धवणे हे वर्षभरापूर्वीपर्यंत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वीय सहायक होते. मात्र, धवणेंची ही खासगी कारस्थाने पुढे येताच 31 जानेवारी 2022 रोजी त्याला स्वीय सहायक पदावरून निष्कासित करण्यात आले आहे. त्याच्या व्यवहाराशी कुठलाही संबंध जोडणे अप्रस्तुत असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अजय धवणे यांना मारहाण करतानाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही बाब लक्षात येताच मारहाण करणारी व्यक्ती रामजी हरणे यांनी वस्तुस्थिती मांडणारी व्हिडीओ क्लीप व्हायरल केली आहे.
यामध्ये हरणे यांनी या मारहाणीमागील रहस्य उलगडले आहे. व्हिडीओ क्लीपमधील रामजी हरणे म्हणतात, मागील काही दिवसांपासून आपण अजय धवणे यांना मारहाण करीत असल्याचा एक व्हिडीओ काही राजकीय षडयंत्रकारी मंडळी मोठ्या प्रमाणावर व्हायरल करीत आहे.हा व्हिडीओ अलीकडचा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न यातून दिसतो. मात्र, तो ऑक्टोबर 2021 मधील व्हिडीओ आहे. मारहाण करणारी व्यक्तीही आपणच असल्याचेही हरणे यांनी स्पष्ट केले आहे.
अजय धवणे हा आपल्या जवळचा व्यक्ती आहे. काही खासगी कामासाठी धवणे यांनी आपल्याकडून रक्कम घेतली होती; परंतु ती रक्कम परत करण्यास तो वारंवार टाळाटाळ करीत होता. नाइलाजास्तव आपण धवणे यांना मारहाण केली.
मात्र, त्यानंतर धवणे यांनी ती रक्कम परत केली. त्यानंतर आपण त्याला माफीही मागितली. त्यानंतर हा विषय तिथेच संपला होता. त्या व्हिडीओतील आपला तेव्हाचा चेहरा आणि आताचा चेहरा यात फरक असल्याचेही हरणे यांनी नमूद केले आहे. मात्र, अलीकडे काही षडयंत्रकारी राजकीय मंडळी जाणीवपूर्वक आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करीत असल्याचे रामजी हरणे यांनी म्हटले आहे.

